लहू चव्हाण
पाचगणी : तांबड्या मातीत रुजलेला कबड्डी खेळ आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचला आहे. या मैदानी खेळाच्या माध्यमातून कबड्डी जपण्याचे काम पाचगणीतील व्यायाम मंडळ करीत आहे. कबड्डीला उज्ज्वल परंपरा आहे. या मैदानातून राज्यस्तरावरील कबड्डीपटू निर्माण होतील, असा विश्वास पाचगणी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल जाधव यांनी व्यक्त केला.
पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील कै. भाऊसाहेब भिलारे स्टेडियमवर व्यायाम मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य जिल्हास्तरीय हौशी व राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी निखिल जाधव बोलत होते. पाचगणी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी या स्पर्धेच्या मैदानाचे फित कापून उद्घाटन केले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, नानासाहेब कासुर्डे, विठ्ठल गोळे, शेखर कासुर्डे, प्रवीण भिलारे, महादेव दुधाने, निसार सय्यद, तानाजी भिलारे, अंकुश मालुसरे, किसन कासूर्डे, शेखर भिलारे, यशवंत पार्टे, सुनील पार्टे, रुपेश बगाडे, आदित्य गोळे तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, खेळाडू उपस्थित होते.
निखिल जाधव पुढे म्हणाले की, पाचगणी शहराचा नावलौकीक व्यायाम मंडळाच्या कबड्डीने सर्वदूर पोहोचला आहे. या मैदानावर खेळलेले खेळाडू निश्चितच राज्यपातळीपर्यंत पोहोचतील असा विश्वास वाटतो. या वेळी निखिल जाधव यांच्या हस्ते सामन्याची ओली-सुकी करण्यात आली. या स्पर्धा सात दिवस चालणार असून, ३५ किलो वजनगटात ४६ संघांनी सहभाग नोंदवला. ३५ किलो वजनगटात जयभवानी क्रिडा मंडळ आणि शाहू क्रीडा मंडळ, पाचगणी यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत जयभवानी क्रिडा मंडळ, शाहूनगर यांनी विजय मिळवला.
प्रास्ताविक राजेंद्रशेठ राजपूरे यांनी केले. संतोष गोळे, प्रमोद पवार, विलास पार्टे यांनी सूत्रसंचालन केले तर अंकुश मालुसरे यांनी आभार मानले.