सातारा : फलटण उपजिल्हा (Satara News) रुग्णालयातील महिला डॉक्टर (Faltan News) आत्महत्या प्रकरणात नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या हातावर आत्महत्येचं कारण स्पष्ट लिहून ठेवले होते. त्यांनी दोन पोलिसांवर शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. या घटनेनंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणावर राजकीय छायाही पडल्याचं दिसत आहे.

डॉ. संपदा मुंडे या फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या निवासस्थानी आत्महत्या केली. सुरुवातीला ही घटना आत्महत्येपुरती मर्यादित असल्याचं समजलं होतं. मात्र, त्यानंतर त्यांच्या हातावर लिहिलेल्या संदेशामुळे आणि कुटुंबीयांनी केलेल्या खुलाशांमुळे या घटनेचा वेगळाच पैलू समोर आला आहे.

मृत डॉक्टरच्या आतेभावाने माध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मागील वर्षभरापासून संपदावर राजकीय तसेच पोलिसांकडून दबाव टाकण्यात येत होता. तिला चुकीचे आणि खोटे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तयार करण्यास भाग पाडले जात होते. ती घरी सगळं सांगत नव्हती, पण आपल्या बहिणीला सगळी माहिती देत होती.” त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की, “या त्रासाला कंटाळून तिनं हे टोकाचं पाऊल उचललं. जून महिन्यात तिनं या प्रकरणाची तक्रार डीवायएसपींकडे केली होती, परंतु अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.”

आतेभावाने आणखी गंभीर आरोप करत सांगितलं की, “त्या तक्रारीत संपदाने एका खासदाराचे, त्यांच्या दोन पीएंचे आणि काही पोलिसांचे नाव स्पष्टपणे नमूद केले होते. या सर्वांचा राजकीय दबाव तिला सतत जाणवत होता.” त्यामुळे आत्महत्येच्या या प्रकरणामागे राजकीय आणि पोलीस साखळीतील दबाव हे महत्त्वाचे कारण असल्याचं कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
या प्रकरणात डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांनी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. “माझ्या बहिणीला न्याय मिळावा, या प्रकरणातील दोषींना शिक्षा व्हावी आणि खोट्या रिपोर्टसाठी दबाव टाकणाऱ्यांना उघड करावं,” अशी मागणी डॉ. मुंडे यांच्या आतेभावाने केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, आत्महत्येपूर्वी सापडलेली माहिती, तिच्या मोबाईलमधील चॅट्स आणि तक्रारींचा तपास तपशीलवार केला जात आहे. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात आणि पोलीस विभागातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.







