सांगली : कर्नाटकातील चिक्कोडीमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गर्भपात करताना सैनिकाच्या पत्नीचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारानंतर गर्भवतीचा मृत्यूचा दाखला मिळविण्यासाठी नातेवाईक महिला आणि अर्भकाचा मृतदेह गाडीमध्ये घालून सांगलीत फिरत होते. त्यावेळी सांगली शहर पोलिसांच्या सतर्कतेने हा सर्व प्रकार उघडकीस आला.
दरम्यान, बागलकोट जिल्ह्यातील महालिंगपूरम येथे गर्भपात केल्यानंतर मृत्यू पावलेल्या महिलेच्या मृतदेहासह सांगलीत फिरणाऱ्या नातेवाइकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गर्भपात केल्यानंतर मृत झालेले अर्भकही गाडीतच आढळून आले. याप्रकरणी चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जयसिंगपूर आणि सांगलीतील प्रत्येकी एक आणि महालिंगपूरममधील दोन यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा महालिंगपूरम ठाण्यात वर्ग करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नेमकं काय घडलं ?
सोनाली सचिन कदम असे मृत विवाहितेचे नाव आहे. सोनालीचे दुधगाव (ता. मिरज) हे माहेर आहे. दुधगाव येथील सोनालीचा काही वर्षांपूर्वी आळते येथील तरुणाशी विवाह झाला आहे. तिचा पती सैन्यदलात कार्यरत आहे. तिला दोन मुली असून, तिसऱ्यांदा ती गर्भवती राहिल्यानंतर गर्भलिंग निदान चाचणी करण्याचे नातेवाईकांनी ठरवले होते.
त्यानंतर चौकशी करून काही दिवसांपूर्वी जयसिंगपूर येथे एका रुग्णालयात गर्भलिंग निदान चाचणी केली. अहवाल मिळताच त्यांनी कर्नाटकातील चिक्कोडी येथील महालिंगपूर येथे एका रुग्णालयात तिचा गर्भपात केला. मात्र, गर्भपातानंतर सोनालीची प्रकृती चिंताजनक बनली आणि तिचा मृत्यू झाला. त्यामुळे नातेवाईकांना मोठा धक्का बसला. त्यांनी सोनालीला अंत्यसंस्कारासाठी सासरी नेण्याची तयारी केली. परंतु, तेथील डॉक्टरांनी मृत्यूचा दाखला देण्यास नकार दिला. त्यामुळे सोनालीचा मृतदेह गाडीत घालून नातेवाईक सांगलीत पोहचले.
कारमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह अन मृत्यू दाखल्यासाठी भटकंती
कारमध्ये विवाहित महिलेचा मृतदेह ठेवून सांगली परिसरात कोणता डॉक्टर मृत्यूचा दाखला देईल याची चौकशी करत नातेवाईक फिरत होते. दरम्यान, मृत्यू प्रमाणपत्र मिळवण्यासाठी महिलेचे नातेवाईक आणि एक वैद्यकीय अधिकारी यांना बसस्थानक परिसरात पोलिसांनी ताब्यात घेतले. याशिवाय गर्भलिंगनिदान चाचणी जयसिंगपूरमधील ज्या रुग्णालयात करण्यात आली, तेथील एक वैद्यकीय अधिकारी आणि प्रत्यक्ष महालिंगपूरम येथे गर्भपात शस्त्रक्रियेत सहभागी असणारे २ वैद्यकीय अधिकाऱ्यांवर सांगली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.