सोलापूर : एसटी चालकाला फिट आल्याने बस रस्त्यावर उलटल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या बसमधून 35 ते 40 प्रवाशी प्रवास करत होते. हा अपघात टेंभुर्णी – कुर्डूवाडी महामार्गावर पिंपळनेर गावाजवळ घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चालकाला फिट आल्याने त्या चालकाचा तोल गेला अन् एसटीचा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही बस टेंभुर्णीवरुन कुर्डुवाडीला जात असताना हा अपघात झाला आहे. या बसमध्ये 35 ते 40 प्रवासी असल्याची माहिती मिळत आहे.
तसेच या अपघातात 24 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी सोलापूरला हलवले आहे. एसटी पलटी झाल्यानंतर प्रवाशांना बाहेर काढून शेतात बसवण्यात आले. तर काही जखमींना कुर्डुवाडी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
एसटी चालकाला फीट आल्यामुळे बस शेतात घुसली. पिंपळनेर नजीक आल्यानंतर एसटी चालकाला फीट आली. त्यामुळे त्याचा पाय एक्सलेटरवर दाबला गेला आणि त्यामुळे ही बस रस्ता सोडून कडेला गेली.चालकाला काही सुचण्याच्या आधीच ती थेट शेतात घुसली थोड्या अंतरावर गेल्यानंतर एसटी उलटली. या प्रकारामुळे एसटीत असलेले प्रवासी चांगलेच भयभीत झाले होते.