Solapur ST Bus Accident : सोलापूर : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरुन धावणाऱ्या एसटी बसचा अपघात झाला आहे. या एसटी बसचे मागचे चाक निखळले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी किररोळ जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी आहेत. पण या घटनेमुळे पुन्हा एकदा एसटी महामंडळाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूरहून येथून ही एसटी बस नांदेडकडे निघाली होती. सोलापूर डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावर हा अपघात झाला आहे. उळे-कासेगाव येथे अचानक एसटी बसचा जॉईंट तुटून चाक निखळले आणि ही बस तिरकी होऊन रस्त्यावरच पलटी झाली. अपघातामध्ये सात ते आठ प्रवासी जखमी झाले असून तीन प्रवासी गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व जखमींना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बसमधून किती प्रवासी प्रवास करत होते याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.
डेपोतून बस बाहेर पडल्यानंतर 15-20 मिनिटात झाला अपघात
नशीब बलवत्तर म्हणून या सर्वांचे प्राण वाचले. बस थांबल्यानंतर सर्व प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. दरम्यान, या घटनेमुळे राज्य परिवहन महमंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. ही एसटी बस डेपोतून बाहेर पडताना तपासण्यात आली नव्हती का? असा सवाल प्रवाशांकडून विचारण्यात आला आहे.
आठवड्याभरातील दुसरी घटना
एसटीच्या अपघाताची ही आठवड्याभरातील दुसरी घटना आहे. 21 नोव्हेंबर रोजी (मंगळवारी) दुपारी सोलापूरहून लातूरकडे जाणाऱ्या एसटी बस चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याने एसटी थेट रोडच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातामध्ये सहा प्रवासी जखमी झाले होते.