Solapur Politics : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांची तयारी जोरात सुरू असून, सर्वच राजकीय पक्षांनी गाव ते जिल्हा पातळीपर्यंत शक्तिप्रदर्शनाला सुरुवात केली आहे. मात्र निवडणुकांआधीच राजकारणात मोठ्या उलथापालथीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) (Sharad Pawar) दोन आमदारांचा शिवसेना (शिंदे गट) संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

मागील काही महिन्यांपासून महाविकास आघाडीतील काही आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचे वृत्त माध्यमांमधून सतत समोर येत आहे. अशा पार्श्वभूमीवर निवडणुकांच्या तोंडावर उघड होत असलेल्या या हालचालींमुळे राज्याच्या राजकीय पटलावर पुन्हा एकदा नेत्यांच्या पक्ष प्रवेशाचा विषय चर्चिला जात आहे.
शिवसेना (शिंदे गट) ने सोलापूर जिल्ह्यातील करमाळा येथे नुकतीच एक आढावा बैठक घेतली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तयारीसाठी झालेल्या या बैठकीत गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांनी कार्यकर्त्यांना अधिकाधिक जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून तयारीस लागण्याचे निर्देश दिले. “जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकांतील यशाचा परिणाम थेट विधानसभेवर होईल,” असे ते म्हणाले.
आमदार नारायण पाटील उपस्थित
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार नारायण पाटील (MLA Narayan Patil) उपस्थित होते, ही बाब विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पाटील हे बैठकीत सक्रिय सहभाग घेताना दिसले. याआधी मोहोळ येथे झालेल्या अशाच बैठकीत राष्ट्रवादीचे आणखी एक आमदार राजू खरे (MLA Raju Khare) देखील सहभागी झाले होते.
भूमिकेवर प्रश्नचिन्ह (MLA Narayan Patil)
आमदार नारायण पाटील यांनी आपल्या भूमिकेवर भाष्य करताना म्हणाले, “मी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चाच आमदार आहे. मात्र एकनाथ शिंदे हे कार्यक्षम नेते आहेत. मतदारसंघातील विकासकामांसाठी त्यांच्याशी माझा नियमित संपर्क असतो.” त्यांनी पक्षांतराच्या चर्चांना सध्या नकार दिला असला, तरी शिंदे गटाच्या संघटनात्मक बैठकीत थेट सहभाग घेतल्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरम्यान, या राजकीय हालचालींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच राज्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याचे संकेत दिसून येत आहेत. महाविकास आघाडीसाठी ही एक चिंतेची बाब ठरू शकते.






