इंदापूर, आदित्य बोराटे

इंदापूर: राजकारणातील सत्ता आणि वर्चस्वाच्या वादातून इंदापूर तालुक्यातील पळसदेव (शिंदेवस्ती) येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जुन्या वादातून थेट खुनी हल्ला करण्यात आला असून, चक्क एका सरपंच महिलेच्या पतीने सात जणांच्या टोळक्यासह शेतकरी शरद काळे यांच्या सह त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात शरद काळे यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर जखमी झाली असून, परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे.
30 मार्च रोजी रात्री साडेसातच्या सुमारास, जेव्हा काळे कुटुंब आपल्या घरात होते, तेव्हा अचानक आरोपींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. हातात काठ्या, लोखंडी गज, केबल वायर आणि चाकू घेऊन आलेल्या या टोळक्याने शरद काळे यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आपल्या पतीला वाचवण्यासाठी त्यांची पत्नी आणि मुलगी मदतीला धावून आल्या, मात्र या निर्दयी हल्लेखोरांनी महिलांवरही हात उचलला. या हल्ल्यात काळे यांच्या मुलीचा पाय फॅक्चर झाला असून, त्यांच्या पत्नीलाही गंभीर दुखापत झाली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा हल्ला पूर्ववैमनस्यातून आणि जुन्या वादातून झाला आहे. गावात राजकीय वजन असलेल्या सरपंच महिलेच्या पतीचा यात सहभाग असल्याचे समोर आले आजे. केवळ मारहाण करून न थांबता, आरोपींनी घरातील साहित्याची तोडफोड केली आणि काळे कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास सुरु आहे.







