पुणे, ता. 1 : मकोका अंतर्गत दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यात दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर पुणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. पिसोळी येथील शर्लिन अव्हेन्यू अपार्टमेंट परिसरात सापळा रचून पोलिसांनी कारवाई केली आहे. आरोपी निलेश श्रीकांत गायकवाड असे अटक करण्यात आलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे.

खंडणी विरोधी पथक- 2 हे काळेपडळ परिसरात पेट्रोलिंग सुरू असताना पोलीस हवालदार नितीन मुंढे यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी निलेश गायकवाड हा पिसोळी परिसरात आपल्या आईला भेटण्यासाठी येणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी पिसोळीत सापळा रचला.

काही वेळातच आरोपी निलेश गायकवाड तेथे येताच पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खूनाचा प्रयत्न, कट रचणे व शस्त्र बाळगणे या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली पोलिसांनी दिली आहे. आरोपी निलेश गायकवाडवर भारतीय दंड संहितेतील कलम307, 120 (ब), 34 तसेच आर्म्स अॅक्ट आणि महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल होता. या प्रकरणात तो मागील दोन वर्षांपासून फरार होता आणि पोलिसांना हवा होता.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त गुन्हे निखील पिंगळे तसेच सहायक पोलीस आयुक्त गुन्हे-2 राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गौरव देव, पोलीस हवालदार नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, साहील शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.







