सातारा: वाई तालुक्यातील वाई -मांढरदेव रस्त्यावरील पांडवगडावर गिर्यारोहकांवर मधमाशांचा हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाले आहेत. यामधील दोघेजण तर घटनास्थळावर बेशुद्ध झाले. या सर्वांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यातील इंदापूरवरून गिर्यारोहक पांडवगडावर ट्रेकिंग करण्यासाठी आज (दि. १०) सकाळी गेले होते. गिर्यारोहकांनी लावलेल्या अत्तराच्या वासाने मधमाशांच्या पोळे विचलित झाले आणि मधमाशांनी थेट गिर्यारोहकांवर हल्ला केला. या हल्ल्यात सहा गिर्यारोहक गंभीर जखमी झाले आहेत. त्यामधील दोन जण बेशुद्ध झाले आहेत. या हल्ल्याची माहिती मिळताच वाई येथील गिर्यारोहक प्रशांत डोंगरे, शिवसह्याद्री बचाव पथक आणि सहकाऱ्यांनी पांडवगडावर धाव घेतली. याप्रकरणी प्रशासनाला माहिती कळविण्यात आली आहे. जखमींना पुढील उपचारासाठी वाई ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात येत आहे.