लहू चव्हाण
पाचगणी : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथील बिलिमोरिया हायस्कूलच्या श्रुती जैन या विद्यार्थिनीने मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत कोल्हापूर विभागाच्या वतीने खेळताना रौप्यपदक पटकावले. या यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तिच्या यशामुळे पाचगणी व बिल्लीमोरिया हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
श्रुती जैन ही बिलिमोरिया हायस्कूलमध्ये आठवीच्या वर्गात शिकत असून, तिने यावर्षी प्रथमच आर्चरी स्पर्धेत भाग घेतला होता. विद्यानिकेतन येथे झालेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेत खेळताना तिने कांस्यपदक पटकावले होते. या स्पर्धेतून तिची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली. त्यानंतर बिलिमोरिया शाळेत झालेल्या विभागीय स्पर्धेत तिने आपल्या खेळाची चुणूक दाखवत पुन्हा कांस्यपदक पटकावले. कोल्हापूर विभागीय संघातून तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली.
मुंबई येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आपल्या कसदार खेळाचे दर्शन घडवत तिने आपल्या संघाला रौप्यपदक मिळवून दिले. श्रृती हिला प्रशिक्षक चंद्रकांत भिसे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रुती जैनच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरुण गोराडीया, दिव्या गोराडीया, संस्थेच्या कार्यकारी संचालिका अदिती गोराडीया, मुख्याध्यापक विशाल कानडे, शैक्षणिक व्यवस्थापक गणेश फरांदे, व्यवस्थापक पंकज चव्हाण, वसतिगृह प्रमुख हेमंत रायकर, कार्यकारी प्रमुख पियूष कामदार तसेच शाळेतील सर्व शिक्षकांनी आभिनंदन केले आहे.