सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यात पती-पत्नीवर काळाने घाला घातला आहे. विहिरीत बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून दक्षिण सोलापुरात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यात बाळगी या गावात विहिरीत बुडून पती-पत्नीचा मृत्यू झाला आहे. पत्नी बुडत असताना बघून तिला वाचवायला पतीने विहीरीत उडी घेतली. संगप्पा चंदाप्पा कोळी, सुनिता उर्फ सावित्री संगप्पा कोळी असे या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत.
शेतातील विहिरीत कपडे धुताना पाय घसरून पत्नी पाण्यात पडल्या. त्या विहिरीत बुडाल्या. पत्नीचा आवाज ऐकून पतीने विहिरीत उडी घेऊन बुडणाऱ्या पत्नीला वाचविण्यासाठी त्याने विहिरीत उडी घेतली. मात्र पत्नीने पतीला मिठी मारल्यामुळे या घटनेत दोघेही बुडाले. पती-पत्नींचा विहिरीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. तरुणांच्या माध्यमातून पती-पत्नीचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मंद्रूप पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.