अहमदनगर : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस जटील होत आहे. आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, असे म्हणत मराठ्यांचे भगवे वादळ मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाले आहे. यातच राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण सुरू आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत संपवण्याच्या सूचना आहेत. मात्र, या सर्वेक्षणात सतत प्रशासनाचा सावळा गोंधळ पाहायला मिळत आहे. सर्वेक्षणासाठी तयार केलेल्या मोबाईल अॅप्लीकेशनमध्ये पहिल्याच दिवशी तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कामकाज ठप्प पडल्याचे पाहायला मिळाले होते. आता तर चक्क पहिली उत्तीर्ण कर्मचाऱ्याची सर्वेक्षणासाठी नियुक्ती केल्याचे समोर आले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
राज्य मागासवर्ग आयोगामार्फत होत असलेल्या मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सामाजिक व शैक्षणिक मागसलेपण तपासण्यासाठी करायच्या सर्वेक्षणासाठी चक्क पहिली पास चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी दिल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर शहरात तर चक्क शिपाई, बिगारी, सुरक्षा रक्षक यांचीही प्रगणक म्हणून नियुक्ती केल्याने गोंधळ उडाला आहे. अशाच एका प्रगणक म्हणून नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वेक्षणासाठी अहमदनगर महापालिकेत चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या अनेक महिलांचीही नियुक्ती केली आहे. यातील बहुतांश महिलांचे शिक्षण जेमतेम चौथी ते नववीपर्यंत असल्याने त्यांना सर्वेक्षण करताना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान, मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करणाऱ्या बहुतांश चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. काहींना इंग्रजी, मराठी लिहिता, वाचता येत नाही. अशा स्थितीत आम्ही सर्वेक्षणाचे काम कसे पूर्ण करणार, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे हे सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत संपवण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून सून, मुलगा व तर काहींनी पैसे देऊन या कामासाठी मुले आणल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे त्यांना कोणतेही प्रशिक्षण देण्यात आलेले नाही.
दरम्यान, अहमदनगर महानगरपालिकेकडून सर्वेक्षणासाठी नियुक्त केलेल्या एका कर्मचाऱ्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. आपले शिक्षण कमी असल्याने सर्वेक्षणाचे काम करता येत नसल्याची कबुली हा कर्मचारी देत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.