सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील एका धक्कादायक प्रकरणात दागिन्यांच्या वादातून मोठ्या जावेने धाकट्या जावेची हत्या करून मृतदेह जाळल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणात न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

गीता पाडुळे असे शिक्षा झालेल्या महिलेचे नाव असून, उज्वला पाडुळे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. उज्वलाचे लग्न 29 नोव्हेंबर 2022 रोजी किरण पाडुळे यांच्याशी झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी ती माहेरी गेली असता तिने आपले मंगळसूत्र व सोन्याची अंगठी घरातील कपाटात ठेवून दिली होती. मात्र, माहेरून परतल्यानंतर दागिने गायब असल्याचे तिच्या निदर्शनास आले.
यावरून उज्वला आणि तिची जाऊ गीता यांच्यात तीव्र वाद झाला. चोरीचा आरोप झाल्याची भावना मनात धरून गीताने संतापाच्या भरात 2 फेब्रुवारी 2023 रोजी घरातच उज्वलाचा गळा आवळून खून केला. गुन्हा लपवण्यासाठी तिने मृतदेहाला आग लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. संशय दूर करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याचा बनाव रचत गीताने स्वतःलाही चाकूने जखमा केल्या.
मात्र, माढा पोलिसांनी सखोल तपास करत घटनाक्रमातील विसंगती उघड केल्या. तपासादरम्यान आरोपीने आखलेला बनाव उघडकीस आला. पोलिसांनी ठोस पुरावे गोळा करून बार्शी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यादरम्यान 12 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे.
सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांवर विश्वास ठेवत न्यायालयाने गीता पाडुळे हिला जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.







