मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी गंभीर आरोप करत मोठी खळबळ उडवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, राष्ट्रवादी नेत्या रुपाली चाकणकर आणि अशोक खरात यांच्यात तब्बल 177 वेळा संपर्क झाला होता, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही खरातला 17 वेळा फोन केल्याचे पुरावे असल्याचा दावा (Sanjay Gaikwad) त्यांनी केला आहे. “हे कॉल नेमके कशासाठी होते?” असा थेट सवाल दमानिया यांनी उपस्थित केला आहे. (Latest Marathi News)
या आरोपांवर शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. दमानिया यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर असे “घाणेरडे आरोप” करणे हे अत्यंत चुकीचे असून ते “बेशरमपणाचे लक्षण” आहे.
गायकवाड पुढे म्हणाले, “कोणी कुणासोबत फोटो काढला किंवा फोन केला म्हणून त्यातून चुकीचा अर्थ काढता येत नाही. त्या भोंदू बाबाच्या पोटात काय आहे, हे शिंदेंना कसं कळणार?” तसेच त्यांनी दमानिया यांच्यावर टीका करत “दोन-तीन महिला विनाकारण टिवटिव करतात, त्यांनी घाणेरडं राजकारण थांबवावं,” असेही वक्तव्य केले.
तथापि, त्यांनी हेही स्पष्ट केले की, अशोक खरातने जे काही गैरकृत्य केले असेल ते समोर यायला हवे आणि दोषींवर कारवाई व्हायलाच हवी. “त्या पवित्र कामात आम्ही सोबत आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. खरात प्रकरणातील कॉल रेकॉर्ड्स आणि राजकीय संबंधांच्या आरोपांमुळे तपासाची व्याप्ती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







