अहिल्यानगर : संगमनेरमध्ये चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी रोजी साडेचारच्या सुमारास नवीन नगर रस्त्यावर कुटे हॉस्पिटलजवळ हा प्रकार घडला आहे. मारहाणीत जखमी झालेल्या साधूंवर घुलेवाडी इथल्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. साधू त्र्यंबकेश्वरला जात असताना त्यांना मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चार साधू त्र्यंबकेश्वरला निघालले होते. ते चहा घेण्यासाठी नवीन नगर परिसरात उतरले. चहा घेतल्यानंतर ते निघाले असताना काही जण आडवे येऊन त्यांनी तुम्ही इकडे कसे काय आलात असं विचारत मारहाण करायला सुरुवात केली. साधूंना चार ते पाच जणांनी मारहाण केली. लाथा बुक्क्या मारण्यात आल्या. मारहाण करणारे हे हिंदी भाषेत बोलत होते असंही मारहाण झालेल्या साधूंनी सांगितलं.
मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये मारहाण सुरू असताना साधू जीव वाचवण्यासाठी पळत होते. तेव्हा त्यांचा पाठलाग करून मारहाण कऱण्यात आली. या प्रकारानंतर बजरंग दल, विहिंपसह हिंदुत्ववादी संघनांनी निषेध व्यक्त केला आहे. तसंच या प्रकरणी लवकर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, साधूंना मारहाण करणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. इतर कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि तणावाची स्थिती निर्माण करू नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे.