सांगली : सांगलीमध्ये माजी उपसरपंचाचा रस्त्यात गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. माजी उपसरपंच आणि सराफ व्यावसायिक बापूराव देवाप्पा चव्हाण असं खून झालेल्या व्यक्तीचे नाव असून हल्ला करणाऱ्यांनी घटनास्थळावरून पलायन केलं. त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता गार्डी इथल्या नेवरी रस्त्यावर ही घटना घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बापूराव चव्हाण यांचं विट्यात सराफ दुकान आहे. याशिवाय गार्डी ते नेवरी रस्त्यावर पोल्ट्रीचा व्यवसाय सुद्धा आहे. २०१८ ते २०१३ या काळात ते घानवड गावचे उपसरपंच राहिले आहेत. गुरुवारी दुपारी तीन वाजता ते गार्डी ते नेवरी रस्त्यानं दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा गावच्या बाहेरच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांकडून हल्ला करण्यात आला आहे. गळ्यावर चाकूने वार करत हत्या केली.
बापूराव चव्हाण यांची हत्या केल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पसार झाले. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथके तयार करून पाठवण्यात आले आहेत.