सातारा : साताऱ्यामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाने व्यवसाय सुरु करण्यासाठी बँकेत कर्ज प्रकरण टाकले होते. मात्र बँकेकडून कर्ज मिळत नसल्याने संतापाच्या भरात थेट बँकेत जाऊन बँक मॅनेजरवर कोयत्याने वार करण्यात आले आहेत. हा धक्कादायक प्रकार सातारा जिल्ह्यातील कराडमधील इंडियन ओवरसीज बँकेत घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्ह्यातील इंडियन ओवरसीस बँकेच्या कराड शाखेचे बँक मॅनेजर आशिष कश्यप यांच्यावर रेठरे बुद्रुक येथील आशुतोष दिलीप सातपुते याने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आशुतोष सातपुते यांनी शेळी पालनासाठी बँकेकडे अर्ज केला होता. मात्र व्यवसायासाठी कश्यप कर्ज देत नाही. याचा राग मनात धरून जिवंत ठेवणार नाही; असे म्हणत आशुतोष याने बँक मॅनेजर कश्यप यांच्यावर सशस्त्र हल्ला केला. यात बँक मॅनेजर कश्यप हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला व हाताला दुखापत झाली आहे.
दरम्यान घटनेनंतर जखमी बँक मॅनेजर कश्यप यांच्यावर कराडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बँकेचे मॅनेजर हे मूळ बिहार राज्यातील असून हल्लेखोर हा कराड तालुक्यातील असून या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे.