सोलापूर: सोलापूर मधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एकाच गावातील घराशेजारी राहणाऱ्या 20 वर्षीय तरुणाने आणि एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे (वय- 20 वर्ष) व आरती दीपक कसबे (वय 17 वर्ष, दोघे रा- पांगरी, ता- बार्शी, जि- सोलापूर) अशी आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. घटनेमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. याबाबत समर्थ उर्फ बाळू लोंढे याचे चुलते संजय रावसाहेब लोंढे (वय 48 वर्ष, रा. पांगरी) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (15 एप्रिल) 2 वाजण्याच्या सुमारास समर्थ दत्तात्रय लोंढे याने मंदाकिनी रामचंद्र घावटे यांच्या शेतात असणाऱ्या चिंचेच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तर येथीलच दुसऱ्या घटनेमध्ये आरती कसबे हिने आपल्या राहत्या घरातील लोखंडी पाईपला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती तिचा भाऊ साहिल दीपक कसबे (वय 22 वर्ष ) याने पोलिसात दिली आहे.
मृत दोघेही एकाच गावात आणि एकदुसऱ्याच्या शेजारी राहत होते. याप्रकरणी पांगरी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक फौजदार सतीश कोठावळे व पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश दळवी करत आहेत.