राहाता (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात घरगुती गॅस सिलिंडर लीक होऊन सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. यात घरातील नऊ जणांसह जनावरे होरपळल्याची घटना घडली आहे. राहाता तालुक्यातील एकरुखे गावात सकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. जखमी व्यक्तींवर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू असून जखमींमध्ये महिला, पुरुष आणि लहान बालकांचाही समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील एकरुखे गावातील वायकर वस्तीवर राहणारे भाऊसाहेब वायकर यांच्या घरातील गॅस सिलेंडर संपले होते. यामुळे नवीन गॅस सिलेंडर लावत असताना यातून मोठ्या प्रमाणात गॅस गळती होऊ लागली. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी गॅस सिलेंडर घराबाहेर आणले. मात्र तेव्हढ्यात बाजूच्या घराबाहेर पाणी तापवण्यासाठी सुरू असलेल्या चुलीतील जाळाचा आणि गॅसचा संपर्क आल्याने भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की परिसरात जाळाचा खूप मोठा भडका उडाला.
या घटनेत घरातील महिला, पुरुष आणि लहान मुलांसह नऊ भाजले गेले. तसेच गोठ्यातील चार ते पाच जनावरे सुद्धा होरपळी आहेत. आजूबाजूच्या नागरिकांनी जखमींना तात्काळ उपचारासाठी लोणी येथील प्रवरा रुग्णालयात दाखल केले. जनावरांवरही उपचार सुरू आहेत.