सोलापूर: जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूपमध्ये ही घटना घडली आहे. एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची घटना समोर माहिती समोर आली आहे. विनायक नागनाथ कुंभार असे गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी बारावीची परीक्षा देत होता. या घटनेची मंद्रूप पोलीस ठाण्यात नोंद झाली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
अधिक माहिती अशी की, जिल्ह्यातील मंद्रूपमधील विनायक नागनाथ कुंभार हा विद्यार्थी लोकसेवा महाविद्यालयात वाणिज्य शाखेत शिकत होता. तो बारावीची परीक्षा देत होता. मात्र ट्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना शुक्रवारी (ता.21 ) सकाळी घडली. विनायक नागनाथ कुंभार (वय 17, रा. कुंभार गल्ली मंद्रूप) असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचंं नाव आहे. विनायक सकाळी उठून अंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला होता. त्यावेळी घरातील बाथरूममधील खिडकीला टॉवेल बांधून त्याने गळफास घेतला. आणि जीवन संपवलं आहे.
दरम्यान, बराच वेळ होऊनही मुलगा बाथरूममधून बाहेर का येत नाही पाहाण्यासाठी वडील गेले असता त्यांनी दरवाजा तोडला. त्यावेळी विद्यार्थ्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने मुलाला मंद्रूपच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र,डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत झाल्याचं घोषित केलं.
विनायक हा मंद्रूप येथील लोकसेवा विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय येथे बारावी वाणिज्य शाखेत शिकत होता. सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेत चार पेपर त्यांनी दिले होते. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. या प्रकरणी मुलाचे वडील नागनाथ कुंभार यांनी मंद्रूप पोलिस ठाण्यात माहिती दिली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्रीमंत जाधव हे करत आहेत.