सातारा : राज्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून राज्यातील सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच साताऱ्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपाचे मदन भोसले यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सध्या सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते मदन भोसले यांची भेट घेतली आहे. वाई विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेतल्याची चर्चा सद्या राजकीय वर्तुळात रंगत आहे. वाई विधानसभा मतदारसंघाचे अजित पवार गटाचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मदन भोसले हे भाजपला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याच बोललं जात आहे.
तसेच दुसरीकडे, माजी खासदार प्रतापराव भोसले यांचे नातू यशराज भोसले यांनीही शरद पवार यांची भेट घेतली आहे. यशराज भोसले हे माजी आमदार मदन भोसले यांचे पुतणे आहेत. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्वाची मानली जात असून त वाई खंडाळा मतदारसंघात विधानसभा लढवण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तसेच यशराज भोसले यांनी मकरंद पाटील यांच्याविरुद्ध निवडणूक लढवण्याची शरद पवार यांच्याकडे इच्छा व्यक्त केली असून लवकरच ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याचेही बोललं जात आहे.