करमाळा: माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार पुन्हा एकदा शिवसेना आणि एकनाथ शिंदेसह महायुतीला जोरदार झटका दिला आहे. करमाळ्याचे शिवसेनेचे माजी आमदार नारायण पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. नारायण पाटील यांच्यासोबत करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती ,माजी पंचायत समीती सदस्य, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, माजी जि.प.सदस्य आणि विविध गावातील सरपंच हे सर्व पदाधिकारी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत माजी आमदार नारायण पाटील यांचा प्रवेश होणार आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
माजी आमदार नारायण पाटील यांनी 2009 मध्ये जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तर 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवत पाटील आमदार झाले होते. माजी आमदार नारायण पाटील हे करमाळा तालुक्यातील वजनदार नेते असून तिथे त्यांचा चांगला प्रभाव आहे. 2019 च्या विधानसभेला शिवसेनेने उमेदवारी कापल्यानंतर केल्यावर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवत मोठे मतदान घेतले होते. शिवसेना पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली तरी देखील ते शिवसेनेतच राहिले होते. कालांतराने शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मात्र त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता त्यांनी लोकसभेच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
करमाळा विधानसभेची जागा महायुतीमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीकडे जाणार असल्याने नारायण पाटील यांना शरद पवार यांच्या पक्षात जाण्याशिवाय पर्याय नव्हता. सध्या करमाळा येथे अजित पवार यांचे समर्थक संजय शिंदे हे आमदार असून नारायण पाटील हे त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत .