मुंबई: माढा लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाने विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना पुन्हा उमेदवारी दिल्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष नाराज झाले आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख संजय कोकोटे यांनी शिवसेनेला रामराम करत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, संजय कोकाटे यांनी शिवसेनेला रामराम केल्याने आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने माढ्यात तुतारीला चांगलेच बळ मिळाले आहे. मुंबईत संजय कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी देखील पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. दरम्यान खासदार रणजितसिंह निंबाळकरांना भाजपने उमेदवारी दिल्याने संजय कोकाटे हे नाराज होते. अखेर त्यांनी शिवसेनेला जयमहाराष्ट्र करत पवार गटात प्रवेश केला आहे.
दरम्यान, आमदार जयंत पाटील यांनी संजय कोकाटे यांचे राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षात स्वागत केले. तुम्ही जर माढ्यात पक्ष संघटना बळकट केली, तर तुमच्याशिवाय तिथं सध्या कोणी नाही, असे जयंत पाटील म्हणाले. तुम्ही जर बुथ लेवलपर्यंत आपली संघटना अधिक बळकट केली तर तुमचाच सुर्य तुतारीच्या आवाजाने उगवेल. माढा लोकसभा मतदारसंघात आता तुतारीच वाजणार असल्याचे देखील जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.