Anil Babar Passed Away : शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. अनिल बाबर हे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. न्यूमोनिया झाल्याने त्यांना मंगळवारी ३० जानेवारी रोजी दुपारी सांगलीतील हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र, बुधवारी पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
अनिल बाबर यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. ते त्यांच्या अंत्यविधीसाठी आटपाडी येथे जाणार आहेत. शिंदे यांनी ट्विट करून बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू आमदार अशी बाबर यांची ओळख होती. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाविकासआघाडी सरकारमध्ये उघडपणे नाराजी व्यक्त करत आमदार बाबर यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देत शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला होता.