शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीत अॅटोमोबाइल दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या सराईत टोळीस शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. २७ जून रोजी पहाटे साडेतीनच्या दरम्यान शिरवळ येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या रामेश्वर अॅटोमोबाइल व गॅरेज येथे एक संशयित स्वीफ्ट कार व संशयित इसम निदर्शनास आले. पेट्रोलिंगकरिता असलेल्या शिरवळ पोलिसांना त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निदर्शनास असल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची झडती घेतली असता, आरोपीकडे लोखंडी कटर, लोखंडी कटावणी, मिरचीपूड, मोबाइल, स्वीफ्ट कार व दरोड्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण ३ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. याबाबत पोलीस अंमलदार नितीन नलावडे यांना खबऱ्याकडून माहिती मिळाली, त्यानंतर पोलीस अंमलदार गिरीश भोईटे, सूरज चव्हाण संग्राम भोईटे यांनी घटनास्थळी आरोपींना पाठलाग करून पकडून ताब्यात घेतले.
शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, पोलीस उपनिरीक्षक शंकर पांगारे, सहा. फौजदार धरमसींग पावरा, पोलीस अंमलदार नितीन नलावडे, गिरीश भोईटे विजय शिंदे, अजित बोराटे, संग्राम भोईटे, सुरज चव्हाण व होमगार्ड जालींधर येळे व रामदास ननावरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.