सातारा : सातारा लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांचा तब्बल ३२ हजार ७७० मतांनी पराभव केला. सुरुवातीला शशिकांत शिंदेंनी १९ हजारांचे मताधिक्य घेऊन आघाडी घेतली आणि विजयी जल्लोषह केला; पण १४ व्या फेरीनंतर बाजी पलटली आणि उदयनराजेंचे मताधिक्य वाढत जाऊन त्यांनी विजयश्री खेचून आणला आणि आमदार शशिकांत शिंदेंना पराभवाचा धक्का दिला. शिंदेंना वाई, कऱ्हाड उत्तर आणि पाटण मतदारसंघांनी अल्प प्रमाणात मताधिक्य दिले. सातारा, कऱ्हाड दक्षिण व कोरेगाव मतदारसंघांनी उदयनराजेंचा विजय सुकर केला. सुरुवातीच्या टप्प्यात महाविकास आघाडी प्रचारात आघाडीवर होती. त्यामुळे शशिकांत शिंदे यांना चांगले वातावरण होते; परंतु अखेरच्या टप्प्यात भाजप व उदयनराजे यांनी अनेक डावपेच टाकले. त्याचेच प्रतिबिंब आजच्या निकालात दिसून आले.
दरम्यान सध्या महाराष्ट्रात सातारा या मतदारसंघाची विशेष चर्चा सुरु आहे. या जागेवर पिपाणी या चिन्हामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाला मोठा फटका बसला असल्याचे समोर आले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे चिन्ह दिलेले आहे. इतर अनेक मतदारसंघांमध्ये देखील अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह देण्यात आले होते. त्यामुळे शरद पवार यांच्या उमेदवाराला मिळणारी मतं फुटण्याची भीती सुरुवातीपासूनच व्यक्त केली जात होती. मतमोजणीच्या दिवशी अनेक मतदारसंघांत ही भीती खरी ठरली. बीड लोकसभा मतदारसंघात पिपाणी हे चिन्ह असणाऱ्या उमेदवाराने तिसऱ्या क्रमांकाची मतं घेतली आहेत. दुसरीकडे साताऱ्यात लोकसभेलाही हीच स्थिती पाहायला मिळाली. पिपाणीला मिळणारी मतं जर शरद पवार यांच्या ‘तुतारी वाजवणरा माणूस’ या चिन्हाला पडली असती तर येथे भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असता.
आमच्या पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ असे चिन्ह मिळाले आहे. त्यामुळे अन्य उमेदवाराला पिपाणी हे चिन्ह देऊ नये, अशी मागणी शरद पवार यांच्या पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली होती. पिपाणी या चिन्हामुळे ग्रामीण भागातील मतदारांमध्ये पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. सातारा लोकसभेचा निकाल पाहून पवार गटाने व्यक्त केलेली ही भीती खरी ठरल्याची चर्चा आहे. जर निवडणूक आयोगाने पिपाणी हे चिन्ह उमेदवाराला दिले नसते तर साताऱ्याचा निकाल कदाचित वेगळा लागला असता, असे मत व्यक्त केले जात आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत झाली. उदयनराजे यांना एकूण 5 लाख 71 हजार 134, तर शशिकांत शिंदे यांना 5 लाख 38 हजार 363 मतं पडली. शिंदे यांचा 32 हजार 771 मतांनी पराभव झाला. दुसरीकडे याच मतदारसंघात पिपाणी हे निवडणूक चिन्ह मिळालेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली.