सातारा : आगामी विधानसभा निवडणुका काही महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत. त्या प्रशवभूमीवर सर्वच पक्षांनी कंबर कसलेली आहे. अशातच आता शरद पवार गटाचे ८ खासदार निवडून आल्याने त्यांची महाराष्ट्रातील ताकद वाढल्याचं दिसून येत आहे.
त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडी सर्व ताकद पणाला लावून विधानसभेच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. दरम्यान, शरद पवारांनी साताऱ्यामध्ये पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर बोलताना मोठं विधान केलं आहे.
शरद पवार रविवारी साताऱ्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर काही महत्त्वाच्या राजकीय मुद्द्यांवर भाष्य केलं.
काय म्हणाले शरद पवार?
शरद पवार म्हणाले, तुम्हाला एवढंच सांगतो. तुम्ही एकत्र राहा, तुम्ही कसे निवडून येत नाही हे मी बघतोच. तुमच्या सगळ्यांच्या मदतीने इथली निवडणूक आपण जिंकू. तसेच महिन्या-पंधरा दिवसांत सगळे एकत्र बसून चर्चा करून मला येऊन सांगा. बारामतीत सांगा, नाहीतर पुणे-मुंबईत येऊन सांगा, की आता आम्ही एक झालो आहोत.
आमच्यापैकी कुणालाही तुम्ही संधी द्या, आम्ही त्याच्यासाठी काम करतो एवढं तुम्ही मला सांगा. या तालुक्याचा चेहरा बदलेल याची खात्री मी तुम्हाला देतो, असा निर्धार शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केला.