सांगली : जयंत पाटील यांना साथ द्या, त्याची उंची खूप मोठी आहे, असे भावनिक आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केले आहे. पवार हे सांगलीत लोकनेते स्व.राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमानंतर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. शरद पवार पुढे म्हणाले की, बापूंच्या अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. बापूंबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली. त्यावेळी मी महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. महाराष्ट्रामध्ये पक्ष आणि कर्तृत्ववान पिढी उभारणीसाठी त्यांनी मोठे काम केले. मंत्री म्हणूनही त्यांनी काम उत्तम केल्याचे शरद पवारांनी सांगितले.
वसंतदादा पाटील आणि राजारामबापू यांच्यात काही मतभेद झाले, असे सांगत सांगली जिल्हा चमत्कारी वाटतो. केव्हा काय करेल सांगता येत नाही. महाराष्ट्रच्या योगदानामध्ये सातारचे योगदान होते. त्यावेळी सातारामध्ये सांगली जिल्हा सुद्धा होता. सांगली हा यातना सहन करणारा जिल्हा आहे. वसंतदादा यांचे जसे योगदान होते, तसे राजारामबापू यांचे योगदान तेवढेच होते, पण वसंतदादा सत्तेत होते आणि राजारामबापू सत्तेत नसायचे अशी टिपण्णी सुद्धा शरद पवार यांनी या कार्यक्रमात केली.