कोल्हापूर: आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरू केली आहे. झाली आहे. सर्वच पक्षांनी मतदारसंघांमध्ये मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून प्रमुख नेत्यांचे दौरे देखील सुरु झाले आहेत. राज्यात महाविकास आघाडीच्या सातत्याने बैठका होत आहेत. या बैठकांमध्ये जागावाटपावर चर्चा केली जात आहे. अशातच महाविकास आघाडीकडून लोकसभेच्या 39 जागांवर एकमत झालं आहे. बाकी जागांबद्दल चर्चा सुरू आहेत. मी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे एकत्र बसून या जागांबद्दल निर्णय घेऊ, असं वक्तव्य शरद पवार यांनी आज कोल्हापूर येथे केले.
कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या खासदार शरद पवार यांनी शाहू छत्रपती यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवारांना पत्रकारांनी विचारलं की, ही राजकीय भेट होती का? शाहू छत्रपतींना राष्ट्रवादीकडून लोकसभेची उमेदवारी दिली जाणार असल्याची चर्चा आहे, या चर्चेत तथ्य आहे का? यावर शरद पवार म्हणाले, लोकसभेच्या उमेदवारांची चर्चा इतक्या लवकर चर्चा सुरू झाली का? मी इतकी वर्षे शाहू छत्रपतींना भेटतोय, परंतु ते मला कधी निवडणूक लढवण्याबद्दल बोलले नाहीत. तसेच सध्या जी चर्चा सुरु आहे, त्यावर मी बोलू शकत नाही. कारण महाविकास आघाडीत मी एकटा नसून आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. त्यामुळे असे निर्णय आम्ही तिन्ही पक्षांमधील सर्व प्रमुख नेते मिळून घेत असतो.
परंतु, लोकसभा निवडणुकीत शाहू महाराज उमेदवार असतील तर मला आनंद होईल. शाहू महाराजांच्या उमेदवारी बाबत तिन्ही पक्षांशी चर्चा करून निर्णय घ्यावा लागेल. शाहू महाराज यांना राजकारणापेक्षा समाजकारणात जास्त रस आहे. जर कोल्हापूरकरांचा आग्रह असेल तर शाहू महाराजांच्या उमेदवारीबाबत मला आनंदच होईल”, असे शरद पवार यांनी म्हटले आहे.