Solapur Politics: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Sharad Pawar) पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली आहे. एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजलं जाणारं सोलापूर पुन्हा एकदा राजकीय घडामोडींमुळे चर्चेत आलं आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी अनपेक्षितपणे पदाचा राजीनामा देत अजित पवार गटात (Ajit Pawar NCP) प्रवेश केला. हा शरद पवारांसाठी धक्का मानला जात असतानाच त्यांनी तत्परतेने नव्या नेतृत्वाची घोषणा केली आहे. सोलापूर शहराध्यक्षपदी महेश गादेकर (Mahesh Gadekar) यांची नियुक्ती करण्यात आली असून, या निर्णयामुळे स्थानिक पातळीवर नवा राजकीय उत्साह निर्माण झाला आहे.

महेश गादेकर हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि जुन्या पिढीतील कार्यकर्ते मानले जातात. 1992 पासून त्यांनी पवारांसोबत सक्रिय राजकारणास सुरुवात केली. त्या काळात ते सोलापूर शहर युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष होते. त्यांच्या कार्यक्षमतेच्या जोरावर 1996 साली त्यांची शहर युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड झाली. 1997 च्या महापालिका निवडणुकीत त्यांनी तरुण कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देत चांगले यश मिळवून दिले.
1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हा गादेकर यांनी काँग्रेस सोडून पवारांच्या पाठीशी उभे राहिले. त्यानंतर 2010 मध्ये त्यांच्यावर सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीचे तब्बल 17 नगरसेवक निवडून आले. 2014 मध्ये त्यांनी सोलापूर उत्तर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती.
राजकीय कारकीर्दीबरोबरच गादेकर यांनी सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातही सक्रिय सहभाग घेतला आहे. ते महाराष्ट्र राज्य खो-खो असोसिएशनचे उपाध्यक्ष, तसेच सोलापूर शहर व जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 2015 मध्ये त्यांनी सोलापूरमध्ये राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते.
शहराध्यक्ष म्हणून कार्यकाळात त्यांनी “फिरता दवाखाना” ही संकल्पना राबवली आणि सलग पाच वर्षांमध्ये सुमारे पाच लाख नागरिकांवर मोफत उपचार करण्यात आले. खासदार शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीच्या 50 वर्षपूर्तीनिमित्त सोलापुरात झालेला भव्य कार्यक्रमही त्यांनीच आयोजित केला होता.
आता पुन्हा एकदा सोलापूर शहराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली आहे. सुधीर खरटमल यांच्या निर्गमामुळे निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पवारांनी आपल्या विश्वासू कार्यकर्त्यावर भरोसा ठेवला आहे. त्यामुळे येत्या स्थानिक निवडणुकांपूर्वी सोलापूरमधील राष्ट्रवादीत नव्या उर्जेचा संचार झाला आहे आणि पवार गटासाठी गादेकर यांची नियुक्ती ही एक धोरणात्मक चाल मानली जात आहे.






