सोलापूर : नाशिक आणि मुंबई दौऱ्यानंतर पुन्हा एकदा पंतप्रधान मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. सोलापूर शहरात 19 जानेवारी रोजी त्यांचा रोड शो आणि रे कॉलनीच्या कार्यक्रमासाठी येत आहेत. नेमका त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सांगोला आणि मंगळवेढा येथे कार्यक्रम घेतल्याने सोलापूर जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलचं तापणार आहे.
या दोन मोठ्या नेत्यांच्या दौऱ्यामुळे जिल्ह्यात अनेक राजकीय उलथापालथी होण्याची शक्यता आहे. दरम्यान या दौऱ्यावेळी शरद पवार हे सोलापूर जिल्ह्यातील मतदारसंघाची राजकीय गणितं जुळवणार का हे पाहवं लागणार आहे. पवार यांच्या सोबत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत. तसेच शरद पवारांचे जुने सहकारी आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदारही हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे.
या कार्यक्रमासाठी सर्व ते एकाच मंचावर
सांगोल्याचे माजी आमदार डॉ. गणपतराव देशमुख यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांनी गणेशरत्न राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. यासाठी शरद पवार हे 19 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता सांगोल्यात पोहचतील. तसेच या कार्यक्रमासाठी सुशीलकुमार शिंदे , विजयसिंह मोहिते पाटील आणि शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांची उपस्थिती असणार आहे .या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी अजित पवार गट , शिवसेना शिंदे गट आणि भाजपच्या अनेक आजीमाजी आमदारांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.