फलटण : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील एका शाळेत धक्कदायक प्रकार घडला आहे. दोन अल्पवयीन मुलींवर त्याच शाळेतील क्रीडा शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तुषार एकनाथ मोहिते (५०, रा. साखरवाडी, ता. फलटण) असे संशयित क्रीडा शिक्षकाचे नाव आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीने काही दिवसापूर्वी तिच्यावर संशयित क्रीडा शिक्षक मोहिते याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना तिच्या मावस भावास सांगितली होती. त्यानंतर त्याने ऑनलाईन ई-कम्प्लेंट दाखल केली होती. यामध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची नोंद केली होती. संशयीत क्रीडा शिक्षक तुषार मोहिते हा शिक्षक पसार झाला आहे.
दाखल तक्रारीच्या अनुषंगाने याबाबत १० फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल झाली. यामध्ये एका शाळेत दहावीत शिकणारी मुलगी डिसेंबर २०२३ मध्ये सायंकाळी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी तुषार मोहितेने लैंगिक अत्याचार केला. तसेच याच शाळेमधील अकरावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवरही डिसेंबर २०२३ मध्येच वडूज येथील जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा संपल्यानंतर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात संबंधित शिक्षकाच्या विरोधात विनयभंग व पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे.