नगर : महिला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालण्यासाठी व निरपराध स्त्रियांच्या संरक्षणासाठी पुढाकार घेत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी नगरच्या भाऊसाहेब फिरोदीया हायस्कुलमध्ये जनजागृतीपर चर्चासत्र घेतले. ‘तिची छेड काढली जातेय का?’ या माहिती पत्रकांचे तब्ब्ल दोन हजार विद्यार्थिनींना वाटप केले. या वेळी विद्यार्थिनींनी तक्रारींचा पाढा वाचला.
शाळा-महाविद्यालय परिसरात मुलींची छेड काढली जाऊ नये आणि काढलीच तर पुढे काय करावे? कशी मदत मिळवावी? यासाठी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत त्यांनी फिरोदिया विद्यालयाच्या विद्यार्थिनींना कायद्याचे धडे देत, भारतीय दंड संहितेमधील विनयभंगाची व्याख्या समजावून सांगितले. लहान मुलांचा लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा काय आहे? याबाबत सविस्तर माहिती दिली.
मुलींची छेड काढल्यास मुलींनी या प्रकाराला कसे सामोरे जावे? तक्रार कशी करावी? आपले नाव कसे गोपनीय राहील याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. या वेळी कोतवाली पोलीस बांधवांनी तयार केलेल्या ऑनलाईन फसवणुकीच्या पत्रकाचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांनी घरी जाऊन देण्यात आलेली दोन्ही पत्रके आई-वडील, बहिण-भाऊ यांना वाचून दाखवावीत, अशा सूचना विद्यार्थ्यांना केल्या.
या वेळी भाऊसाहेब फिरोदिया माध्यमिक विद्यालयाचे उपप्रायार्य रावसाहेब बाबर, प्राध्यापिका आशा सातपुते, विष्णु गिरी, बाळु वाव्हळ, शोभा पालवे व इतर शिक्षक-कर्मचारी, पोलीस हवालदार देवेंद्र पांढरकर, राजेंद्र गर्गे उपस्थित होते.
आवाहनानंतर मुलींनी वाचला तक्रारींचा पाढा!
‘कुणी काही त्रास देत असेल तर सांगा कारवाई करू’ पोलीस निरीक्षक यादवांनी असे आवाहन केल्यानंतर मुलींनी अनेक तक्रारी केल्या. घराच्या आजूबाजूचे, शाळाबाह्य मुले, विद्यालयातील काही मुले तसेच काही स्कूल व्हॅनचे चालक आदींबाबत तक्रारी प्राप्त झाल्या. आता त्यांच्यावर कारवाई होणार असल्याचे यादव यांनी जाहीर केले.
तब्बल दहा हजार माहिती पत्रकांचे होणार वाटप!
मुली व महिलांना त्रास झाल्यानंतर तक्रार कशी करावी? कोठे करावी? अशा प्रसंगांना सामोरे कसे जावे? याबाबतची तब्बल दहा हजार माहिती पत्रके तयार करण्यात आली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे वाटप सुरू करण्यात आले आहे. जर कोण छेड काढत असेल तर बिनधास्तपणे तक्रार करावी, संबंधिताचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असे आवाहन करण्यात आले.