सांगली : वाळवा तालुक्यातील गोटखिंडी येथे सुनेचा विनयभंग केल्याचा जाब विचारणाऱ्या ७० वर्षीय वृद्धाची काठीने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आष्टा पोलिसांनी परप्रांतीय शेतमजूर राजू याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मृत वृद्धाचे नाव पांडुरंग गोविंद कोकाटे (वय ७०) असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे यांच्या शेतातील गोठ्यात त्यांची सून शेण काढण्याचे काम करत होती. त्यावेळी शेजारच्या शेतात काम करणारा परप्रांतीय शेतमजूर राजू तेथे आला. त्याने महिलेचा हात पकडून तिला उसाच्या शेतात येण्यास सांगितल्याचा आरोप आहे. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने याची माहिती आपल्या सासऱ्यांना दिली.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर पांडुरंग कोकाटे यांनी कुटुंबीयांना बोलावून संबंधित शेतमजुराला जाब विचारला. याचा राग आल्याने राजूने काठीने कोकाटे यांच्या हात, पाय, डोके आणि शरीरावर बेदम मारहाण केली. एवढेच नव्हे तर त्यांच्या छातीवर बसूनही त्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे.

आरडाओरड ऐकून कुटुंबीय आणि आसपासचे नागरिक घटनास्थळी धावून आले. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या कोकाटे यांनी कुटुंबीयांना “राजूनेच माझ्यावर हल्ला केला,” असे सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. त्यानंतर त्यांना तातडीने आष्टा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन भंडारे यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेनंतर आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र ग्रामस्थ आणि कोकाटे कुटुंबीयांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणाची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अरुण पाटील, पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे, सत्यजित आवटे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी भेट दिली. मंगल पांडुरंग कोकाटे यांच्या फिर्यादीवरून आष्टा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.







