ठाणे : मुंब्रा परिसरात मैत्रीचे नाते क्षणात रक्तरंजित वैरात बदलल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ‘तू मोठा भाई की मी मोठा भाई’ या वादातून एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर मृताची ओळख लपवण्यासाठी त्याचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे करून मृतदेह जंगलात टाकण्यात आला. या प्रकरणाचा छडा लावत ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट-४ ने दोन आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, खर्डी गावाजवळील निर्जन भागात एका तरुणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. मृतदेहाचे शीर आणि दोन्ही हात नसल्यामुळे मृताची ओळख पटवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले होते. तपासादरम्यान फैज सुलतान मलिक आणि अल्बान सुलतान मलिक यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी त्यांचा मित्र अमन मुस्कीन शेख याची हत्या केल्याची कबुली दिली.

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात रात्री मुंब्र्यातील खर्डी गाव परिसरात अमन शेख आणि फैज मलिक यांच्यात ‘मोठा भाई’ कोण यावरून वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर फैजने चाकूने अमनच्या गळ्यावर वार केला. त्यात अमनचा मृत्यू झाला.

यानंतर आरोपींनी पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह निर्जन ठिकाणी नेला. तेथे त्याचे शीर आणि दोन्ही हात धडापासून वेगळे केले आणि शरीराचे अवयव वेगवेगळ्या ठिकाणी टाकल्याचा आरोप आहे. एवढेच नव्हे, तर संपूर्ण हत्येचा व्हिडिओ आरोपींनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित मोबाईल जप्त केला असून त्याची फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे.
मुख्य आरोपी फैज मलिक याच्यावर यापूर्वी खून, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तर मृत अमन शेख याच्याविरुद्धही चोरी आणि मारामारीचे गुन्हे नोंद असल्याचे तपासात समोर आले आहे. सध्या पोलिसांकडून मृताचे शीर आणि हत्येत वापरण्यात आलेले शस्त्र शोधण्याचे प्रयत्न सुरू असून मुंब्रा पोलीस ठाण्यात या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.







