गोंदिया : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विविध राजकीय विषयांवर भाष्य करत भाजप आणि महायुती सरकारवर जोरदार टीका केली. नवनीत राणा यांच्या प्रस्तावित हनुमान चालीसा पठणाबाबत विचारले असता, “नवनीत राणा हा चिल्लर विषय आहे. अशा विषयांवर मी बोलत नाही,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

१८ जुलै रोजी नागपूरमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली रामरक्षा आंदोलन होणार आहे. त्याच दिवशी अमरावतीतील हनुमान गडावर खासदार नवनीत राणा हनुमान चालीसा पठण करणार असल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर दानवे यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार देत हा विषय महत्त्वाचा नसल्याचे सांगितले.

यावेळी त्यांनी नवनाथ बन यांनी केलेल्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. “बन-फन हे चिल्लर लोक आहेत. त्यांच्या वक्तव्यांवर बोलण्याची गरज नाही,” असे दानवे म्हणाले.
राज्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात सुरू असलेल्या राजकारणावरही त्यांनी भाष्य केले. “राज्यात आणि गोंदिया जिल्ह्यातही भाजप राष्ट्रवादीची जिरवते आणि राष्ट्रवादी भाजपची जिरवते, अशी परिस्थिती आहे. ‘त्यांचीच अडवा आणि त्यांचीच जिरवा’ हा प्रकार सुरू आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
सरकारी बंगल्यांच्या वादावर बोलताना दानवे म्हणाले की, उपसभापती सचिन अहिर यांच्यासाठी असलेला बंगला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या ताब्यात असल्याचे समजते. जर एखाद्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाला सरकारी बंगला दिला जात असेल, तर इतर पक्षांच्या प्रदेशाध्यक्षांनाही समान न्याय मिळायला हवा. सरकारी मालमत्ता ही जनतेची असल्याने अशा बाबींमध्ये समान धोरण असावे, असे त्यांनी म्हटले.
याशिवाय, भाजपकडे विकासाचा नव्हे तर देशाला लुटण्याचा अजेंडा असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच ‘लाडकी बहीण’ योजनेतील लाखो अर्ज बाद झाल्याचा उल्लेख करत, ही योजना निवडणुकीत मते मिळवण्याचा राजकीय डाव असल्याची टीकाही त्यांनी केली.







