पुणे : आंबेगाव येथील दत्तनगरमधील सहाय्यक दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदणीस नकार दिल्याच्या कारणावरून सहाय्यक दुय्यम निबंधकावर मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित दस्तामध्ये आवश्यक लेआउट नसल्याने सहाय्यक दुय्यम निबंधकांनी दस्त नोंदणी करण्यास नकार दिला. याचा राग आल्याने अॅड. योगेश, तुषार आणि महेश यांनी कार्यालयात गोंधळ घातल्याचा आरोप आहे.

तिघांनी सहाय्यक दुय्यम निबंधकाला शिवीगाळ करत हाताने तसेच बांबूने मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. शासकीय कार्यालयातच अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थित कर्मचारी आणि नागरिकांमध्ये घबराट पसरली. या घटनेनंतर कार्यालयातील कामकाजावरही काही काळ परिणाम झाला.
घटनेची माहिती मिळताच आंबेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी संबंधित तिघांविरुद्ध आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास सुरू असून, हल्ल्यामागील नेमके कारण तसेच या प्रकरणातील इतर बाबींची चौकशी केली जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांवर कार्यालयातच झालेल्या हल्ल्यामुळे कर्मचारी वर्गातूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे.






