बार्शी : मागील तीन दिवसापूर्वी शेतात काम करण्यासाठी गेलेल्या मायलेकी बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. ही घटना साकत (ता बार्शी) येथे सोमवारी (ता. 09) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात मिसिंग केस दाखल करण्यात आली आहे.
सारीका लखन मोरे (वय 32) व त्यांची मुलगी हिंदवी लखन मोरे (वय 03) अशी बेपत्ता झालेल्या मायलेकींची नावे आहे. याप्रकरणी सारीकाची आई निलावती सुरेश खटाळ (वय 50, साकत ता बार्शी) यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सारीका ही शेतात काम करण्यासाठी गेली होती. त्यावेळी सारिकाने तिच्यासोबत तिची मुलगी हिंदवीलाही सोबत घेऊन गेली होती. दरम्यान, सारिकाचे पती लखन यांना सारिका व मुलगी आढळून आले नाहीत. तसेच सारिकाचा फोन लागत नव्हता. तेव्हा मोरे व खटाळ कुटुंबाने सारिका व हिंदवीचा शोध घेतला. मात्र दोघेही मिळून आल्या नाही. म्हणून सारिकाच्या आईने मायलेकी बेपत्ता झाल्याची खबर वैराग पोलीस ठाण्यात दिली आहे.
सारीका चा रंग गोरा, उंची 165 सेमी, अंगात चॉकलेटी रंगाची साडी घातलेली आहे. तर हिंदवी चा रंग गोरा, चेहरा उभट, अंगात लाल शाळेचा ड्रेस घातलेला आहे. अशा वर्णनाची महिला व मुलगी आढळून आल्यास, नागरिकांनी पोलिसांशी त्वरित संपर्क करावा. असे आवाहन वैराग पोलिसांनी केले आहे. अथवा सारिकाच्या नातेवाईकांशी ९७६४४५१८१० या क्रमांकावर माहिती द्यावी.