अहमदनगर: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या विरोधात विरोधकांची मोट बांधण्यात पुढाकार घेणारे जनता दल युनायटेडचे अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आता भाजपसोबत सत्ता स्थापन करणार असल्याचे चित्र आहे. लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल आणि महाआघाडीसोबत काडीमोड घेत नितीशकुमार हे पुन्हा एकदा भाजपसोबत जाणार आहेत. नितीश कुमार यांना पुन्हा एकदा पलटूराम म्हटले जात असताना दुसरीकडे खासदार संजय राऊत यांनी फक्त नितीशकुमारच पलटूराम नाही असे म्हणत भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
अहमदनगर येथील वंजारवाडीत संजय राऊत यांना संत वामनभाऊ आणि संत भगवानबाबा प्रतिष्ठानच्यावतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. राऊत यांनी म्हटले की, पलटूराम हे फक्त नितीशकुमार नाहीत. तर पहिले पलटूराम भाजपा आहे. नितीश कुमार आमच्या दारात उभे राहिले तरी त्यांना भाजपमध्ये घेणार नाही, अशी वक्तव्य भाजप नेत्यांनी केली होती. त्यामुळे खरी पलटुराम ही भाजपच आहे, अशी टीका संजय राऊत यांनी केली.