सांगली : राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाचा हाहाकार बघायला मिळाला आहे. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील या भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशातच सांगली जिल्हा कारागृहातून आतापर्यंत 80 कैदी कोल्हापूर मधील कळंबा जेल मध्ये हलवण्यात आले आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य , कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे. सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
सध्या मुसळधार सुरु असलेल्या पावसामुळे सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये 20 महिला कैदी आणि 60 पुरुष कैदी यांचा समावेश आहे. आतापर्यंत 80 कैदी कळंबा जेलमध्ये हलवण्यात आले आहेत, यामध्ये मोस्ट मोस्ट वॉन्टेड कैद्यांचा देखील समावेश आहे.
कृष्णा नदीची पाणीपातळी वाढत आहे. दुसरीकडे सांगलीत पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता दिसून येत आहे. सांगली जिल्ह्यातील कारागृहात देखील पाणी शिरते. 45 फूटांच्या आसपास पाणी गेल्यानंतर कारागृहात पाणी जाण्यास सुरूवात होते. सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पुर्णपणे सज्ज आहे. पुरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा आणि इतर वस्तुंचा साठा करून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले असल्याची माहिती सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिली.