सांगली : विनापरवाना आणि पूर्वमंजुरीशिवाय दीर्घकाळ कामावर गैरहजर राहणाऱ्या सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या 37 कर्मचाऱ्यांवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांनी या सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे महापालिकेच्या प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी सलग 90 दिवसांपेक्षा अधिक काळ विनापरवाना गैरहजर असल्याचे तपासात आढळून आले. यानंतर संबंधितांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. नागरी सेवा आणि अत्यावश्यक सुविधांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी दिला आहे.
या कारवाईपूर्वी महापालिकेच्या चारही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हजेरी नोंदींची सखोल तपासणी करण्यात आली. वॉर्ड मुकादम, स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक आयुक्तांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या पडताळणीत अनेक कर्मचारी दीर्घकाळ अनुपस्थित असल्याचे समोर आले.
निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये सर्वाधिक 28 कर्मचारी आरोग्य आणि स्वच्छता विभागातील आहेत. याशिवाय पाणीपुरवठा विभागातील 5 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अग्निशमन, जलनिस्सारण, सार्वजनिक बांधकाम आणि सुरक्षा विभागातील प्रत्येकी एका कर्मचाऱ्याचाही यात समावेश आहे. निलंबित कर्मचाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सफाई कामगार आणि शिपाई वर्गातील कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
महापालिकेच्या मते, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि अग्निशमन या सेवा थेट नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित आहेत. संबंधित कर्मचारी दीर्घकाळ गैरहजर राहिल्यामुळे कामकाजावर ताण निर्माण झाला होता. काही भागांत कचरा व्यवस्थापन आणि पाणीपुरवठ्याबाबत तक्रारीही वाढल्या होत्या.
दरम्यान, प्रशासनाने केवळ निलंबनावर न थांबता संबंधित कर्मचाऱ्यांविरोधात विभागीय चौकशी सुरू केली आहे. महाराष्ट्र नागरी सेवा नियमांनुसार त्यांना सेवेतून बडतर्फ करण्याची प्रक्रिया देखील प्रस्तावित करण्यात आली आहे.
निलंबन कालावधीत संबंधित कर्मचाऱ्यांचे मुख्यालय त्यांच्या विभागातच राहणार असून त्यांना अन्य कोणतेही काम करण्यास परवानगी नसणार आहे. भविष्यातही कामचुकारपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अशाच प्रकारची कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिका प्रशासनाने दिला आहे.






