कोल्हापूर: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेल्या कागल येथील समरजितसिंह घाटगे यांची कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवरील (डीपीसी) नामनिर्देशित सदस्यपदाची नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. घाटगे यांच्यासह माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल यांची नियुक्तीही रद्द करण्यात आली. नियोजन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला.
कागल विधानसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घाटगे यांनी भाजपच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देत राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हाती घेतली. घाटगे यांनी भाजपला सोडचिट्ठी दिल्याने अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाने त्यांची कोल्हापूर समितीवरील नियुक्ती रद्द केली. राज्य सरकारने आता कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीवर डॉ. सुभाष जाधव आणि अॅड. हेमंत कोलेकर यांची विशेष निमंत्रित म्हणून नियुक्ती केली आहे.