सोलापूर : प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला चारही शंकराचार्यांनी जाण्यास नकार दिल्याचे सांगितले आहे. तसेच शंकराचार्यांना सर्व धार्मिक पद्धती माहिती असतात त्यामुळे त्यांनी 22 तारखेला तेथे जाण्यासाठी बहिष्कार टाकला असावा, असं रोहित पवार म्हणाले. सोलापूरमध्ये पत्रकारांशी बोलताना राम मंदिर उद्घाटन सोहळ्यावरुन रोहित पवार यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे.
दरम्यान, राम मंदिर उद्घाटन सोहळा अगदी काही दिवसांवर आला आहे. एकीकडे देशभरात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि दुसरीकडे राजकीय वातावरणही तापल्याचे पाहायला मिळत आहे. राम मंदिर उद्घाटन हा धार्मिक सोहळा नसून भाजपचा इव्हेंट असल्याची टीका शिवसेना ठाकरे गटाकडून होत आहे. अशातच आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही भाजपवर टीका केली आहे.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, 22 तारखेच्या कार्यक्रमात धार्मिक कार्यक्रम कमी आणि राजकीय कार्यक्रम जास्त होत आहेत, असा धर्मगुरूंचा आरोप आहे. मंदिर पूर्ण होण्याआधीच तो कार्यक्रम घेतला जातो त्यामुळे लोकांना राजकीय वास येत आहे. तसेच विकासाचे मुद्दे भाजपकडे राहिले नाहीत त्यामुळे राम मंदिरावर इलेक्शन लढायचे आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.