श्रीगोंदा: रात्रीच्या अंधारात धारदार शस्त्रांसह दरोड्याच्या तयारीत असलेली सराईत दरोडेखोरांची टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी (दि. २६) रात्री पकडली आहे. या टोळीकडून कत्ती, सुरा, लोखंडी कटावणी, मिरचीपुड, २ महागडे मोबाईल, १ मोटारसायकल असे १ लाख ४७ हजार ८०० रुपयांचे साहित्य जप्त केले आहे. श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकरवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. आदिक आजगन काळे (वय ५०), समीर आदिक काळे (वय २२, दोन्ही रा. म्हसणे, ता. पारनेर) व आकाश रविंद्र काळे (वय 21, रा. गटेवाडी, ता. पारनेर) असे पकडलेल्या तिघा दरोडेखोरांची नावे आहेत.
तर त्यांचे साथीदार वारुद भास्कर चव्हाण, कोक्या भास्कर चव्हाण, सतीश भास्कर चव्हाण, अजय संतोष भोसले ( सर्व रा. कोळगांव, ता. श्रीगोंदा) व राहुल अर्पण भोसले (रा. म्हसणे, ता. पारनेर) असे ५ जण अंधाराचा फायदा घेवून पसार झाले आहेत. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यात घडलेल्या गंभीर गुन्ह्यांची उकल करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिलेले होते. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक तुषार धाकराव, पोलीस अंमलदार बबन मखरे, रविंद्र कर्डीले, मनोहर गोसावी, संतोष लोढे, देवेंद्र शेलार, फुरकान शेख, संतोष खैरे, मच्छिद्र बर्डे, आकाश काळे, जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, बाळासाहेब गुंजाळ, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ व संभाजी कोतकर यांचे पथक नेमुन गुन्हे उघडकिस आणणे बाबत सुचना दिल्या होत्या.
सदर पथक जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक आहेर यांना शुक्रवारी रात्री गोपनीय माहिती मिळाली की, सराईत गुन्हेगार आदिक आजगन काळे हा त्याचे इतर ७ ते ८ साथीदारांसह ३ मोटार सायकलवर येवुन श्रीगोंदा तालुक्यातील वेठेकरवाडी ते पांढरेवाडी जाणाऱ्या रोडवर ओढयामध्ये थांबुन कोठे तरी दरोडा घालण्याच्या तयारीत अंधारात दबा धरुन बसलेले आहेत. ही माहिती त्यांनी पथकाला सांगितली. या पथकाने तेथे जावून पाहिले असता ७ ते ८ संशयित झुडपाच्या मागे दबा धरुन बसलेले दिसले. पथकाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न करताच सर्वांनी पळ काढला, मात्र त्यातील तिघांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. उर्वरित ५ जण पसार झाले. पकडलेले तिघेही सराईत दरोडेखोर आहेत. त्यांच्यावर बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.