सागर घरत
करमाळा : करमाळा तालुक्यातील कुकडी प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गावांना पिण्यासाठी कुकडीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला असून, १ मार्चपासून हे आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवारी) पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. कुकडी संयुक्त प्रकल्प उन्हाळी हंगाम २०२३- २४ च्या नियोजनाबाबत झालेल्या या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संजयमामा शिंदे, कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, राम शिंदे यांच्यासह कुकडी संयुक्त प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
या बैठकीविषयी अधिक माहिती देताना आमदार शिंदे म्हणाले की, करमाळा तालुक्यात टंचाईचा सामना होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. कुकडी लाभक्षेत्रातील गावांना कुकडीचे पाणी मिळावे, यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कालवा सल्लागार समितीचे सचिव यांनाही पत्रव्यहावर केला होता. त्यानुसार कुंभारगाव, कोर्टी, मोरवड, वंजारवाडी, रावगाव, कुस्करवाडी, विहाळ, पोंधवडी, अंजनडोह, वीट, पिंपळवाडी, देलवडी, जातेगाव, कामोणे राजुरीला आदी गावांना दुष्काळामुळे कुकडीतून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.