मोहोळ : क्रिकेट व व्हॉलीबॉल क्षेत्रामध्ये नावलौकिक मिळविलेला राष्ट्रीय खेळाडूने सिना नदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना २८ सप्टेबर रोजी उघडकीस आली. नितीन सुभाष गायकवाड (वय-४८ रा. बुधवार पेठ, मोहोळ) असं उडी मारून आत्महत्या केलेल्या राष्ट्रीय खेळाडूचे नाव आहे. याबाबत नितीन गायकवाड याचा भाऊ प्रविण गायकवाड यांनी मोहोळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहोळ येथील बुधवार पेठ परिसरात नितीन गायकवाड हा २६ सप्टेंबर रोजी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर गेला. तो रात्री उशीरापर्यंत घरी परत आला नाही. त्यामुळे २७ सप्टेंबरला मोहोळ पोलीस ठाण्यात नितीन गायकवाड याचा भाऊ प्रविण गायकवाड यांनी तक्रार दिली होती.
दरम्यान, २८ सप्टेंबर रोजी दुपारी पावणे तीन वजनाच्या सुमारास नितीन गायकवाड याचा मृतदेह लांबोटी परिसरामध्ये सिना नदीच्या पात्रात आढळून आला. त्याचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणले असून पोलीस ठाण्यात अज्ञात कारणामुळे नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केल्याबाबतची नोंद करण्यात आली आहे.
नितीन गायकवाड हा मोहोळ येथील एसटी स्टॅन्डमधील पेपर विक्रेते सुभाष गायकवाड यांचा मुलगा आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्यामध्ये व्हॉलीबॉल व क्रिकेट क्षेत्रामध्ये त्याने नावलौकीक मिळविला होता. त्याच्या पश्चात आई, वडी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन भाऊ, भावजय असा परिवार आहे.