सागर जगदाळे
भिगवण : रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते. रक्तदान केल्याने अनेकांना जीवदान मिळते. तुमच्या रक्ताचा एक थेंब इतका मौल्यवान असू शकतो, याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून देशसेवेसाठी आपले आयुष्य खर्ची घालणारे निवृत्त सैनिक मेजर ज्ञानदेव शहाजी गलांडे यांच्या संकल्पनेतून करमाळा व इंदापूर तालुक्याच्या सीमेवरील कोंढार चिंचोली (ता. करमाळा) याठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेले हे रक्तदानाचे कार्य सायंकाळी सहा वाजले तरी सुरू होते. सोलापूर जिल्ह्यात प्रथमच विक्रमी रक्तदान झाले. या शिबिरात ४७७ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
या रक्तदान शिबीराचे उद्घाटन मेजर ज्ञानदेव गलांडे यांच्या आई-वडिलांच्या हस्ते करण्यात आले. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बारामती ऍग्रो कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी मेजर ज्ञानदेव गलांडे मित्र परिवाराच्या कामाचे कौतुक केले. ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजावर प्रेम केले पाहिजे. कारण या समाजाने आपल्याला खूप काही दिले आहे. समाजाचे देणे समजून दरवर्षी रक्तदान करा, असे आवाहन त्यांनी केले.
प्रास्ताविकात मेजर ज्ञानदेव गलांडे यांनी भविष्यात ग्रामीण भागातील मुलांसाठी मोफत पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करायचा मानस व्यक्त केला. आजच्या रक्तदान शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील तरुणांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतल्याचे निदर्शनास आले. करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली व आसपासच्या गावातील तरुण वर्गाने या उपक्रमात हिरीरीने सहभाग घेत विक्रमी रक्तदान घडवून आणले.
प्रत्येक रक्तदात्यास या वेळी मेजर ज्ञानदेव गलांडे मित्रपरिवाराच्या वतीने ब्लूटूथ हेडफोन व ट्रॅक सूटचे वाटप करण्यात आले. रक्त संकलन करण्यासाठी रेड प्लस ब्लड बँक, पुणे यांचे सहकार्य लाभले. रक्तदान शिबिराला अनेक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी भेट देऊन या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.