फलटण: राज्यातील दुष्काळ हटवणारे खरे नेते हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचे वक्तव्य भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे. नीरा देवधरच्या पाण्याचा लाभ हा लाखो लोकांना होणार आहे. तेव्हा बारामतीकरांच्या हातात सत्ता होती. त्यांनी 23 वर्ष काम सुरू होऊ दिले नाही, असे म्हणत निंबाळकर यांनी शरद पवार यांना टोला लगावला. तर देवेंद्र फडणवीस साहेब आज तुमच्यामुळं आम्ही कडू गोळी गिळतो आहे, असं म्हणत नाव न घेता निंबाळकरांनी रामराजे नाईक निंबाळकरांना देखील टोला लगावला.
बुधवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निरा देवधरच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच विविध विकासकामांचे उद्घाटनही देखील करण्यात आले. त्या कार्यक्रमात खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर बोलत होते. फलटणला कमिन्स आली पण आमच्या लोकांना काम मिळले नाही. आता नाईक बोंबवाडी येथील एमआयडीसी मुळे लोकांना रोजगार मिळेल असे निंबाळकर म्हणाले. तुम्ही फलटण-पंढरपूर रेल्वे मार्ग देखील मार्गी लावला. बंगळुरुला जाणारा कॉरिडॉर हा फलटण आणि माण मधून जाणार असल्याचे ते म्हणाले.