माढा: वंचित बहुजन आघाडीने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी स्वतंत्रपणे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.वंचितने आतापर्यंत एकूण 20 जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. वंचितचे अध्यक्ष माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी माढा या लोकसभा मतदारसंघातून रमेश बारसकर यांना उमेदवारी दिली आहे. बारसकर हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते आहेत. दरम्यान, बारसकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सोडून विंचितमध्ये प्रवेश केला आहे. याच कारणामुळे शरद पवारयांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने बारसकर यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे.
रमेश बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश चिटणीसपदी कार्यरत होते. मात्र वंचित बहुजन आघाडीने तिकीट दिल्यानंतर आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे बारसकर यांची हकालपट्टी करताना राष्ट्रवादीने वंचितचा किंवा वंचितच्या संबंधित कोणत्याही नेत्याचा उल्लेख केलेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीतील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क अलिकडच्या काळात वाढला होता. ही बाब लक्षात घेऊन पक्षाकडून त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस -शरदचंद्र पवार पक्षाने दिले आहे.
ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाने केला आहे. रमेश बारसकर हे आता वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर माढ्यातून निवडणूक लढवणार आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट मिळवण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. मात्र आपल्याला संधी मिळणार नाही, हे लक्षात येताच त्यांनी वंचितमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर बरसकर यांना तिकीट मिळाल्यामुळे माढ्यातील निवडणूक चुरशीची होऊ शकते.
माढ्यात तिरंगी लढत होणार?
भारतीय जनता पक्षाने खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. माढा या मतदारसंघावर राष्ट्रवदीचे वर्चस्व असताना देखील 2019 साली भाजपच्या तिकिटावर रणजितसिंह निंबाळकर यांनी विजय मिळवला होता. यावेळीही त्यांच्यावरच भाजपने विश्वास दाखवला आहे. महविकास आघाडीने मात्र अद्याप या ठिकाणी आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. या मतदारसंघात धनरगर समाजाचे प्रमाण पाहता खासदार शरद पवार हे येथून रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी देण्यासाठी उत्सुक होते. मात्र जानकर यांना महायुतीतुन उमेदवारी मिळाल्याने या जागेसाठी नव्या उमेदवाराचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघडीने येथून उमेदवार उभा केल्यामुळे महाविकास आघाडीला फटका बसतो का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.