पुणे: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी (आठवले गट) चे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या गाडीचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. रामदास आठवले यांच्या वाहनाला कंटेनरने धडक दिली आहे. या अपघातात रामदास आठवले यांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने मंत्री रामदास आठवले या अपघातातून सुखरुप बचावले असून त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. यानंतर रामदास आठवले हे दुसऱ्या वाहनाने मुंबईला रवाना झाले आहेत. सातारा जिल्ह्यातील वाईजवळ ही अपघाताची घटना घडली आहे. आठवले हे वाईहून मुंबईच्या दिशेला येत असताना एका कंटेनरने त्यांच्या गाडीला धडक दिली.
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या वाहनाच्या अपघाताची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थक आणि कार्यकर्त्यांमध्ये एकच अस्वस्थता निर्माण झाली होती. अपघातानंतर रामदास आठवले यांच्याकडून अधिकृतपणे कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. थोड्या वेळाने ते त्यांच्या अधिकृत फेसबुक किंवा ट्विटर हॅण्डवरून याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे.